प्रवेश सुरु
  • Home
  • /
  • ब्लॉग्स
  • /
  • शाळा एक संस्कार केंद्र नव्हे दुसरे घरच.......

शाळा एक संस्कार केंद्र नव्हे दुसरे घरच.......

शाळा एक संस्कार केंद्र नव्हे दुसरे घरच....... Posted on March 6, 2025

श्रीम. अनिता भोसले

उपमुख्याध्यापक

 शाळा म्हटले की डोळ्यासमोर येते शाळेची भव्य इमारत, मुलांनी फुललेले क्रीडांगण, ग्रंथांनी समृद्ध ग्रंथालय, अद्यावत प्रयोगशाळा.शाळा ही केवळ शिक्षण अथवा ज्ञान देणारे ठिकाण नाही तर, सुसंस्कारांचे मंदिर आहे म्हटले तर वावगे ठरणार नाही अभ्यासाबरोबरच प्रत्येक विद्यार्थ्यांला जाणून घेऊन त्याच्यातील सुप्त कलागुणांना फुलवणारी शाळा ही जणू एक फुलबागच असते. ज्याप्रमाणे हाताची पाचही बोटे एक समान नसतात त्याचप्रमाणे येणारे प्रत्येक मूल स्वतंत्र अस्तित्व व स्वतंत्र विचाराचे असते आणि म्हणूनच शाळेची जबाबदारी खूपच महत्त्वाची असते.  

घरानंतर सर्वात जास्त वेळ मूल शाळेत असते शाळेच्या वेळा तील प्रत्येक क्षण त्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा असतो. म्हणूनच शाळेतील प्रत्येक उपक्रमाचे नियोजन करणे आवश्यक असते.केवळअभ्यास,परीक्षा, स्पर्धा याबरोबरच शाळेत राबवले जाणारे सर्व उपक्रम यातून होणारे अनेक संस्कार कळत नकळत घडत असतात. खेळातून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारी संघभावना, सहकार्य, नेतृत्व गुण,खिलाडू वृत्ती, यश अपयश पचवण्याची वृत्ती तसेच सहजीवन घडत जाते. दिनविशेष सारख्या उपक्रमातून थोरामोठ्यांबद्दल आदर भाव,सेवा, त्याग, बलिदान, देश, धर्म, संस्कृती बद्दल निष्ठा आणि प्रेम या भावना वाढीस लागायला मदत होते.विविध स्पर्धा व परीक्षा द्वारे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासू वृत्ती, नियमितता, सातत्य, चिंतन, मनन करण्याची सवय निर्माण व्हायला निश्चितच उपयोग होतो. 

दैनंदिन शालेय परिपाठ हे जणू संस्कारांचे अमृतच म्हणावे लागेल.शालेयजीवनात म्हटलेली एखादी प्रार्थना ही आपण कधीच विसरू शकत नाही. शालेय जीवनात कमावलेली मैत्री, जिवलग मित्र हीच तर जणू आयुष्यभराची पुंजीच असते.या साऱ्या संस्कारांमध्ये गुरूंचे स्थान सर्वोच्च असते यात शंकाच नाही.शाळेत व्यतीत केलेले ते सुंदर क्षण मित्र-मैत्रिणींबरोबर केलेली मस्ती.....खेळ, स्पर्धेच्या सरावाच्या वेळी काढलेल्या खोड्या,चेष्टा मस्करी...स्नेहसंमेलनाच्या सरावाच्या गमती जमती.. दिलेली टोपण नावे... या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही संस्कारक्षम वयात घडलेले हे संस्कार विसरू म्हटले तरी विसरणे शक्य नसते. आणि म्हणूनच म्हणतात, बालपणीचा काळ सुखाचा, खऱ्या अर्थाने आईनंतर मुलाला कोणी लळा लावत असेल तर ती शालामाऊली आणि म्हणूनच 'ही आवडते मज मनापासुनी शाळा लाविते लळा ही जसा माऊली बाळा' ही सानेगुरुंची कविता अगदी सार्थ आहे असे मला वाटते.