प्रवेश सुरु

कला असे मानवासी भूषण

कला असे मानवासी भूषण Posted on March 7, 2025

श्रीम. आभा अभ्यंकर

सहाय्यक शिक्षिका

'व्यक्त होणं' ही आपल्या अनेक गरजांपैकी एक मूलभूत गरज आहे. कला हे अभिव्यक्तीचे सर्वोत्तम माध्यम आहे. संवाद आणि माहिती संप्रेषणाच्या या युगात जर ही अभिव्यक्ती  उत्तम साधता आली तर आपण नक्कीच यशवी होऊ शकतो आणि सुख आणि समाधानही आपल्याला मिळते. 

संस्कारक्षम शालेय जीवनात कलेच्या विविध माध्यमांशी ओळख व्हावी आणि त्यामध्ये निपुणता यावी, यासाठी विविध आंतरवर्गीय तसेच आंतरशालेय स्पर्धांतून विद्यार्थिनींना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.  मराठी,संस्कृत, हिंदी ,इंग्लिश भाषेतील विविध वक्तृत्व स्पर्धा, वाद विवाद स्पर्धा, नाट्यस्पर्धा, संगीतस्पर्धा, काव्य आणि नाट्य अभिवाचनस्पर्धा, स्वरचितकाव्य अभिवाचनस्पर्धा, चित्रकलास्पर्धा यांसारख्या अनेक प्रकारच्या स्पर्धांसाठी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले जाते. तसेच विद्यार्थिनींमधील कलागुण जाणून त्यांनी ती कला जोपासावी यासाठी प्रोत्साहन आणि मार्गदर्शनही केले जाते. त्यांनी केलेल्या कलाकृती काचफलकांत प्रदर्शित केल्या जातात तसेच प्रशालेच्या नियतकालिकात विद्यार्थिनींनी लिहिलेले लेख, कविता सादर केलेल्या असतात. दिनविशेषांच्या निमित्ताने त्यांनी तयार केलेल्या कलाकृतींची प्रदर्शनेही शाळेमध्ये भरविली जातात. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक प्रशिक्षणातून रांगोळी, क्राफ्ट, जरदोसी वर्क, मोती काम यांचे वर्ग शाळेत घेतले जातात त्यातून विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळतोच पण पुढे यात नैपुण्य मिळवून त्या या कलेचा उपयोग स्वतःचा व्यवसाय म्हणून करून स्वतःच्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर बनू शकतात. कलेमुळे स्वतःची ओळख निर्माण होऊ शकते. 

शब्द, स्वर,रंग  असे व्यक्त होण्याचे माध्यम कोणतेही असले तरी मार्गदर्शनामुळे त्यात निपुणता येते, योग्य  पद्धतीने  ते माध्यम हाताळण्याचे कौशल्य विकसित होते .यातून आत्मविश्वास निर्माण होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या कलांमुळे मेंदूतील वेगवेगळी आनंदकेंद्रं उद्दीपित होत असल्यामुळे आपण आतूनच सुखी ,समाधानी होतो. स्वनिर्मितीचा आनंद आणि त्या स्वनिर्मितीच्या आनंदाबरोबरच दुसऱ्यालाही तो आनंद अनुभवायला देता आला याचाही आगळावेगळा आनंद मनाला मिळतो आणि चांगल्या कलाकृती निर्माण करणारा कलाकार आणि उत्तम कलाकृतींना दाद देणारा जाणकार रसिकही यातून निर्माण होतो. 

 विविध स्पर्धांमधून सहभाग  घेऊन  शाळा विद्यार्थिनींना स्वतः मधील कमतरता जाणून घेणे त्यावर मात करणे, इतरांमधील उत्तम ते आत्मसात करणे,दाद देणे, प्रसंगी अपयश पचवणे, पुन्हा प्रयत्न करून त्यावर मात करणे याचेही संस्कार  घडवत असते. आनंदी आणि समाधानी  विद्यार्थी-विद्यार्थिनी म्हणजे  सुखी,समाधानी देशाचे भावी नागरिक. अशाप्रकारे शाळा कलेतून  समाजमन घडविण्यात  आपले योगदान देत असते.