आमच्याबद्दल
अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स मध्ये आपले सहर्ष स्वागत
अभ्यासकलाक्रीडानिपुणा अभिनवोपक्रमशीला ।
नित्ययशोशिखरविराजमाना अहिल्यादेवीप्रशाला ।।
इ.स. 1880 मध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, वामन शिवराम आपटे, महादेव बल्लाळ नामजोशी या पंचायतनानी राष्ट्रीय शिक्षणाच्या उद्देशाने न्यू इंग्लिश टिळक रोड या शाळेची मुहूर्तमेढ रोवली. यानंतर 24 ऑक्टोबर 1884 रोजी 'अपत्याच्या पोटी मातेचा जन्म 'अशा अलौकिक न्यायाने डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. या काळात विद्यार्थी संख्या पाहून मुलींसाठी स्वतंत्र शाळेचा विचार पुढे आला. यशवंतराव होळकर महाराजांनी नाममात्र किमतीत होळकर वाडा डेक्कन एज्युकेशन सोसायटीला प्रदान केला. पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या याच होळकर वाड्यात 1 जून 1939 रोजी मुलींची शाळा सुरु झाली. यावेळी 14 शिक्षक व 264 विद्यार्थिनींनी प्रारंभ झाला. शाळेला पुण्यश्लोक अहिल्याबाईचे नाव द्यावे असा प्रस्ताव वामन शिवराम आपटे यांनी संस्थेकडे मांडला. यानुसार 1944 रोजी पुण्यश्लोक अहिल्या दिनाच्या दिवशी फलटणच्या राणीसाहेब श्रीमंत सौ. लक्ष्मीदेवी निंबाळकर यांच्या शुभहस्ते शाळेचे नामकरण अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स असे करण्यात आले. अत्यंत वैभवशाली परंपरा लाभलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीची अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स ही मुलींची एकमेव प्रशाला!
प्रशालेमध्ये पाठ्यपुस्तकातील शिक्षणाबरोबरच पूरक व व्यावसायिक शिक्षण सुरू झाले. यातूनच विविध उपक्रमांचा जन्म झाला पर्यावरण संरक्षण संगणकीय ज्ञान, चित्रकला, संगीत, नाट्य, वक्तृत्व क्रीडा याबरोबरच शिवणकाम, मोती काम, भरतकाम इत्यादी कलांचे मार्गदर्शन केले जाते. यासोबत प्रशालेत जपान अभ्यास वर्ग, इंग्रजी स्पोकन वर्ग घेतले जातात. शाळेचा मानबिंदू असणारे अद्ययावत ग्रंथालय, सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष गणित वाटिका, भूगोल कक्ष विद्यार्थिनींच्या सृजनशीलतेला वाव देतात. आधुनिक कौशल्यांबरोबरच पारंपारिक मूल्ये, प्राचीन कला, भारतीय संस्कृती, यांची जोपासना दैनंदिन परिपाठ तसेच विविध उपक्रमातून साजरे केले जातात. शिक्षक आणि विद्यार्थिनींसाठी विविध कार्यशाळा उपक्रम यांचे आयोजन होते . या सर्व उपक्रमामुळे विद्यार्थिनींचे नेतृत्वगुण, संवाद कौशल्य, संघभावना, आत्मविश्वास, खिलाडू वृत्ती असा व्यक्तिमत्त्वाचा सर्वागीण विकास होतो.
1939 पासून आजतागायत PGSSA मध्ये प्रशाला यशोशिखरावर आहे. बँड लेझीम, कॅलेस्थेनिक्स, लोकनृत्य, आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा, राज्यस्तरीय रानडे वक्तृत्व स्पर्धा, ही आजही प्रशालेची वैशिष्ट्ये आहेत . या वैशिष्ट्या बरोबरच अद्ययावत तंत्रस्नेही कौशल्याचे विकसन होत असतानाच मैदानातील सहभागामुळे विद्यार्थिनींचा सोशल मीडिया व मोबाईलच्या विळख्यातून वेळ वाचवण्यास मदत होते. यामुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सातत्याने जपण्याचा प्रयत्न चालू आहे राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी प्रशालेच्या यशोमुकुटात अनेक सन्मानाचे तुरे खोवून प्रशालेचा नावलौकिक वाढवलेला आहे. माजी विद्यार्थिनींशी स्नेहबंध प्रशाला जोपासत आहे. यशस्वीतेची ही धुरा वाहणारी मातृशक्ती म्हणजेच प्रशालेत कार्यरत 43 शिक्षिका अत्यंत निष्ठेने अहिल्याकन्याकांना घडवत आहेत
तन मन विकासाचे व्रत आमुचे खरे
रुजवितो वैश्विक मूल्ये अन पाझरती झरे
पावन भूमी अहिल्येची विद्यादानाचे सेवक सारे
नीतीमूल्यांची पावक ओंजळ 'एकी हेच बळ' ब्रीद खरे!
उद्दिष्ट
विद्यार्थिनींमधे खाली नमूद केलेल्या गुणांच्या आधारे एक आदर्श नागरिक घडविणे.
- जबाबदार
- समंजस
- साधक
- स्वाभिमानी
- तंत्रस्नेही
- संयमी
- स्वयंसेवी
- क्रियाशील
- मेहनतीने यशाला गवसणी घालण्यास शिकविणे.
- आरोग्यसंपन्न आणि आनंदी व्यक्तिमत्त्व घडविणे.
- शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आरोग्य टिकवण्यासाठी सक्षम बनविणे.
ध्येय
समाजाच्या विविध घटकांच्या सहयोगातून प्रामाणिक प्रयत्न करत सामान्य घरातून मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेणा-या विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कला, क्रीडा वक्तृत्व, नाट्य, नाट्यवाचन, संस्कृती, परंपरा, इ. चे शिक्षण देण्यासाठी शिक्षक, पालक, माजी विद्यार्थिनी, स्वयंसेवी संस्था, इ. च्या माध्यमातून प्रयत्न करत राहणे.
हुशारीला जर प्रयत्नांची जोड असेल तर विद्यार्थिनी हे गुण सहज आत्मसात करू शकतात. एकाच छताखाली या सर्व बाबींचे शिक्षण देणे म्हणजे एकात्मिक शिक्षण होय. माजी विद्यार्थिनी आपल्या छोट्या बहिणींच्या शिक्षणासाठी वेळ देतात तसेच नाट्य, संगीत, समुपदेशन, करिअर मार्गदर्शन, विविध क्रीडा प्रकारांचा सराव घेण्यासाठी उत्सुक असतात. शाळा आपल्यावर जबाबदारी देते ही बाब त्यांच्यासाठी अभिमानाची असते. हाच वारसा आजही पुढे चालत आहे.
स्वयंसेवी वृत्तीने काम करताना कशाचीही अपेक्षा न करता काम करण्याची म्हणजेच नि:स्वार्थी वृत्तीने काम करण्याची सवय लावावी लागते. गुणवत्तापूर्ण काम करायचे असेल तर त्यासाठी अपेक्षित वेळ दिलाच पाहिजे ही बाजू मनात रुजवावी लागते. असे संस्कारी नागरीक देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी झटत राहिले तर देशाचा विकास नक्की होईल यात शंका नाही. त्यामुळे उत्तम नागरिक घडविण्यासाठी अपेक्षित संस्कार हे शाळेतच केले पाहिजेत. जितक्या लहान वयात या बाबी समजतील तितका विकास लवकर होणार हे नक्की.
आम्ही सर्वोत्तम का आहोत?
उत्कृष्ट शैक्षणिक घटक
शाळेतील अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आव्हानात्मक बनवण्यासाठी , त्यांच्यामध्ये असलेल्या क्षमतांना प्राप्त करण्याकरिता आणि त्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेला आहे.
अनुभवी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी
शाळेतील प्रत्येक घटक उत्साही, तंत्रस्नेही, उच्चविद्याविभूषित असून प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध आहेत.
अत्याधुनिक सुविधा
शाळेचा आधुनिक परिसर शिक्षणासाठी पोषक असून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी परिपूर्ण वातावरण मिळण्यास त्यामुळे मदत होते.