मानवी जीवनात संगीताचे महत्व
Posted on March 7, 2025
सौ. मानसी देशपांडे
संगीत शिक्षिकासंगीत आणि अध्यात्म संगीत आणि आरोग्य संगीत आणि एकाग्रता संगीत आणि मनस्वास्थ्य संगीत आणि अभ्यास संगीत आणि पशु पक्षी वनस्पती यांचे नाते.
खरंच या ज्या जोड्या लावल्या आहेत त्या योग्य आहेत का? निश्चितच संगीत आणि अध्यात्म असे म्हणतात ६४ कलांपैकी गायन, वादन, नृत्य करणाऱ्या संगीत साधकांना परमेश्वराचा आशीर्वाद पटकन मिळतो. कारण या कलांमुळे परमेश्वर निश्चितच सुखावतो. अध्यात्म म्हणजे काय? तर मनाला लाभणारी शांतता,प्रसन्नता, ध्यान, चिंतन यामुळे मिळणारी मानसिक शांतता म्हणजेच अध्यात्म.
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक संस्कृत श्लोक, ऋचा, स्तोत्र गायले जातात. या सर्वांमध्ये परमेश्वराचे गुणगान केलेले असते आणि ते संगीतबद्ध असते. त्यात एक नाद, लय,चाल ठरलेली असते पण त्यातून होणारा आनंद अवर्णनीय असा असतो. अनेक देवदेवतांच्या स्तुतीपर गीता मध्ये गाण्याला खूप महत्त्व आहे उदाहरणच द्यायचे झाले तर पंचपदी, करुणाष्टके, आरत्या गायल्या जातात. कीर्तनकार सुद्धा आपल्या कथेमध्ये अभंग गाऊन त्या कथेची गोडी वाढवतात.
मंदिरांमध्ये सनई, चौघडा, नगारे या वाद्यांचे मंगलमय वादन केलं जातं.संगीत आणि आरोग्य संगीताचे महत्त्व अनन्य साधारण असेच आहे. संगीतामध्ये सात स्वरांचे सप्तक असते तसेच पाच विकृत स्वर सुद्धा यामध्ये येतात त्यामुळे सप्तक 12 स्वरांचे होते. या बारा स्वरांमध्येच सगळे संगीत सामावलेले आहे. याच सप्तकाच्या माध्यमातून शास्त्रीय संगीतात अनेक रागांची निर्मिती झाली आहे. या रागांना स्वतःचा असा एक मूड (भाव) आहे, समयाचे बंधन आहे. जाणकारांनी वेगवेगळे प्रयोग करून हे सिद्ध केले आहे की रागांच्या ऐकण्यामुळे काही रोग, काही व्याधी आटोक्यात येतात. ध्यानासाठी काही राग उपयोगात आणलेले आहेत.
आपल्या शरीरात सप्तचक्र असतात प्रत्येक चक्रावर स्वर आणि रागांचा प्रभाव नक्कीच जाणवतो तो स्वर आणि तो राग गायल्यानंतर त्या त्या ठिकाणचे चक्र प्रभावित होते, कार्यान्वित होते. आपल्या शरीरातील चक्र बिघडल्यानेच आपल्याला व्याधी जडतात. या व्याधींपासून सुटका होण्यासाठी, आपले आरोग्य छान ठेवण्यासाठी संगीत आणि संगीत योगा अतिशय महत्त्वाचे आहे.
योगा, व्यायाम म्हणजेच शारीरिक मेहनत. हे करताना आपल्या कष्ट होतात. हे कष्ट आपण संगीताच्या माध्यमातून सहजपणे आनंदाने करू शकतो. संगीतकाराने स्वतःचे आरोग्य सुद्धा नीट ठेवणे खूप गरजेचे आहे कारण शास्त्रीय संगीत गाणारा तीन तीन तास मैफलीसाठी बसू शकणारा असायला हवा त्यामुळे संगीत आणि आरोग्य यांचे अतिशय जवळचे नाते आहे. जसे शारीरिक आरोग्यासाठी संगीत महत्त्वाचे आहे तसेच मानसिक आरोग्य निरामय राहण्यासाठी ध्यानधारणा, ओंकार साधना, एखाद्या वाद्याचा शांत, गंभीर आवाज हे सर्व मानसिक शांतता लाभण्यासाठी उपयोगी आहेत.