सौ. दीपा अभ्यंकर
मुख्याध्यपिका
नमस्कार!
अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स ही डेक्कन एज्युकेशन सोसायटीची फक्त विद्यार्थिनींची शाळा आहे. शाळा शहराच्या मध्यवस्तीत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेतून शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे मराठी भाषिकांसाठी मातृभाषेतून दर्जेदार शिक्षणाची हमी देणारी शाळा आहे. एकात्मिक शिक्षण देणारी शाळा आहे. राष्ट्रीय एकात्मतेचे शिक्षण देणारी शाळा आहे.
प्रशालेत विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले जाते. विद्यार्थिनींच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव दिला जातो. हुशारीला मेहनतीची जोड देऊन यशाला गवसणी घालण्याची शिकवण शाळेत दिली जाते. आधुनिक जगात आवश्यक असणा-या शिक्षणाबरोबरच भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन करण्याचे शिक्षण शाळेत दिले जाते. यासाठी शाळेत उत्तम गुणवत्ताधारक शिक्षक आहेत.
क्रीडासंस्कृती जोपासलेली मुलींची शाळा आहे. महिला शिक्षक विद्यार्थिनींचा विविध क्रीडाप्रकारांचा सराव जातीने लक्ष देऊन करून घेतात. शाळेच्या विविध उपक्रमांतून समाजाला उत्तम नागरिक, खेळाडू, वक्ते, कलाकार, नेते, प्रशासकीय अधिकारी, संघटक, इ. मिळण्यास मदत होते.
अशी मध्यवस्तीत असलेली, मेट्रोस्टेशन पासून पायी चालत जाण्याच्या अंतरावर असलेली, गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण देणारी, विद्यार्थिनींच्या आरोग्याची व सुरक्षिततेची जबाबदारी घेणारी आणि जागरूक व जबाबदार नागरिक घडवणाऱ्या या शाळेत आपल्या मुलीला प्रवेश घेण्यास आपण नक्कीच उत्सुक असाल याची खात्री आहे.