पुण्यातील प्रतिथयश शाळांमध्ये 'अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स' या शाळेची गणना आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा वारसा पुढे नेत शिस्त, अनुशासन, उपक्रम, प्रशिक्षित शिक्षक, समृद्ध ग्रंथालय, आवश्यक भौतिक सुविधा तसेच शाळेचे छोटेसे मातीचे मैदान ही शाळेची प्रमुख बलस्थाने ! आम्ही दोघे पतिपत्नी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे माजी विद्यार्थी असल्याने आमच्या कन्येसाठी शाळा निवड करताना आम्हाला निर्णय घेणे सोपे झाले. त्यामुळे रानडे बालक मंदिर ते अहिल्यादेवी प्रशाला असा १३ वर्षांचा अतिशय आनंददायी प्रवास तिने अनुभवला. आज पालक म्हणून तिच्या शैक्षणिक प्रवासाकडे पाहताना मला समाधान बाटत आहे.
कोविड महामारीच्या काळात दूरस्थ पद्धतीने भरणारी शाळा असो किंवा मराठी माध्यमाच्या शाळांपुढील पटसंख्या वाढविण्याचे आव्हान असो शाळेचे सर्व घटक मा. शाळाप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली सतत कार्यरत असतात. सर्व अडचणींवर मात करून पुढची पिढी उत्तम घडविण्यासाठी शाळा सतत धडपड करत असते. त्याचे फळ म्हणजे आज विविध क्षेत्रामध्ये आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थीनी देशात आणि परदेशात नाव गाजवित आहेत. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून मला पालक शिक्षक संघ कार्यकारिणीमध्ये प्रत्यक्ष सहभागी होण्याची संधी मिळाली. यानिमित्ताने शालेय कामकाजाचे स्वरूप जवळून अनुभवता आले. विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात प्रत्यक्ष सहभागी होता आले. ते कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्यात मोठा आनंद मिळाला. पालकसंघाचे काम करण्याची संधी मिळाल्याबदल शालासमितीच्या अध्यक्षा, शालाप्रमुख, सर्व पालक, पालक प्रतिनिधी, सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी, सेवक वर्ग यांचा मी आभारी आहे !
मी सौ. कुमुदिनी मधुकर कापरे अहिल्यादेवी हायस्कूल गर्ल्स या शाळेची माजी विद्यार्थिनी आणि आता पालक.
अहिल्यादेवी या नावाशी एक वेगळीच नाळ जोडली गेली आहे माझी. अहिल्यादेवी यांचे जन्मगाव चौंडी लगतच माझं सासर आहे आणि दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या अहिल्यादेवी होळकर पुरस्कराची मी मानकरी ठरले याचे संपूर्ण श्रेय मी माझ्या शाळेलाच देईल. शाळेने जे साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचे संस्कार दिले ते शाळा सोडून किती वर्ष झाली तरी अजून आम्हा विद्यार्थिनींच्या अंगी रुजलेले आहेत. माझे पती डॉ. मधुकर कापरे यांच्या मदतीने एका पडीक माळरानावर डाळिंब शेती करून सर्वोत्कृष्ट फलोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याचा मान मिळवला. मला जेव्हा पुरस्कार मिळाला तेव्हा माझ्या मुलीने हट्ट धरला की आई तू ज्या शाळेत शिकलीस त्याच शाळेत मला शिकायचंय म्हणून यंदा माझ्या मुलीला आपल्या शाळेत घातले.
मराठी भाषेवर विशेष प्रेम असल्यामुळे तिला A+ श्रेणी असताना देखील 5वी इंद्रायणी मध्ये प्रवेश घेतला. शाळेविषयी लिहायचं म्हटल तर शब्द कमी पडतील. शाळेने दिलेले संस्कार, शिस्त अजूनही पंचवीस वर्ष झाली तशीच आहे. माझ्या शाळेचा मला नेहमी अभिमान वाटतो.
नमस्कार मी सौ. मनाली ओमकार गोवंडे , माझी पाल्य अनन्या ओमकार गोवंडे ,नववी गंगा...
अहिल्यादेवी शाळेबद्दल कृतज्ञता किती व्यक्त करावी , तेवढी थोडीच आहे. डेक्कन एज्युकेशन संस्थेच्याच, नवीन मराठी शाळेमध्ये चौथीपर्यंतचे शिक्षण घेऊन , पाचवीसाठी माझी लेक अहिल्यादेवी मध्ये दाखल झाली. त्यावेळेला कोरोनाचे वातावरण होतं. शाळा ऑनलाईन चालू होती ..
तो सगळा बिकट कालावधीच झरकन डोळ्यासमोर येऊन गेला ,तर त्या परिस्थितीत सुद्धा शाळेने मुलींची शिक्षणाची संपूर्ण काळजी घेत जे अतिशय नियोजनबद्ध वेगवेगळे उपक्रम राबवले त्याला तोड नाही. ऑनलाईन घेतलेलं गॅदरिंग हे त्यामध्ये विशेष.. त्यानंतर शाळा व्यवस्थित सुरू झाली आणि आजपर्यंत शाळेने माझ्या मुलीसाठी जे काही केलेले आहे ते शब्दात व्यक्त करू शकत नाही. खरोखरच एखाद्या बगीच्यामध्ये कळी हळूहळू उमलत जावी, खुलावी तशा पद्धतीने माझ्या मुलीचा व्यक्तिमत्वविकास या शाळेने घडवून आणला आहे. त्याबद्दल या शाळा माऊलीचे आम्ही अतिशय ऋणी आहोत.
शाळेबद्दल चार ओळी आठवतात
ही आवडते मज मनापासून शाळा ,
लाविते लळा की जसा माऊली बाळा...
हे शब्द अगदी हुबेहूब अहिल्यादेवी शाळेचे आणि माझ्या मुलीचे नातं व्यक्त करणारे आहेत..
आपल्या अहिल्यादेवी प्रशालेने स्नेहसंमेलनाचा महामेरू आधुनिक तंत्रज्ञाना TODAY पेलला... नुसता पेललाच नाही तर यशस्वीही करून दाखवला. कलात्रिवेणी ची तीनही पुष्पे चढत्या भाजणीने आम्हाला आनंद प्रदान करून गेली.केवळ विद्यार्थिनींमधील कला-गुणांचीच ओळख झाली नाही तर पडद्यामागील शिक्षकांचे कर्तृत्वही समोर आले. पडद्यावर 'ब्लॅक आऊट' होत नसूनही प्रत्येक नेपथ्य वेळेवर 'हलत' होतं, ते स्वयंसेवक झालेल्या अनेक विद्यार्थिनी आणि शिक्षिकांमुळे.
विषयांचे वैविध्य हे यावर्षीच्या स्नेहसंमेलनाचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य. मराठीला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे चरित्र आणि सर्वात शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास...हे तीनही विषय विभागल्याने प्रत्येक विषयाची मांडणी व सादरीकरण नीटनेटके... उत्तमझाले. वंदे मातरम् सार्ध शतीच्या निमित्ताने दोन्ही दिवशी अखंड 'वंदे मातरम्'चे गान हेही कार्यक्रमाचे ठळक वैशिष्ट्य. यावर्षीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्नेहसंमेलनाला लाभलेले पाहुणे. प्रत्येकजण आपल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारा आणि तज्ज्ञ. त्यामुळे विद्यार्थिनींसमोर आदर्श उदाहरणे राहिली. प्रत्येकाने आपले नेमून दिलेले काम उत्तम केले तर काय होते, हा वस्तुपाठ प्रशालेने दिला. त्यामुळेच कार्यक्रम वेळेवर सुरू होऊन विद्यार्थिनी वेळेवर सुरक्षितपणे घरी पोहोचल्या. पालक प्रतिनिधी म्हणून आम्हाला स्नेहसंमेलनात प्रत्यक्ष उपस्थित राहता आले, यासाठी मा.मुख्याध्यापिका आणि प्रशालेचे मनःपूर्वक धन्यवाद!
वैविध्यपूर्ण विषय आणि वैविध्यपूर्ण सादरीकरणांनी कलात्रिवेणी हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या दरम्यान मुलींमधल्या विविध कला तर लक्षात आल्याच, पण शिक्षकांची अपार मेहनतही ठळकपणे समोर आली. नियोजन, त्यातला नेटकेपणा, सूत्रबद्धपणा, मुलींना दिल्या जाणाऱ्या विविध सूचना आणि त्या सूचना मुलींना फॉलो करण्याची असलेली सवयही नेटकेपणाने दिसत होती. सादरीकरणं जितकी छान होती, तितकच संमेलन पाहायला असणाऱ्या मुलींनी केलेलं सहकार्यही मला खूप महत्त्वाचं वाटलं. 'वक्ताची वक्ता नोहे श्रोतेनिवीन..' या संत ज्ञानेश्वरांच्या उक्तीप्रमाणे या मुली समोर चालणार सगळं ऐकत, आस्वादत होत्या., हे विशेष विशेष.
मला व्यक्तिगत एक गोष्ट नमूद करावीशी वाटते आहे, स्नेहसंमेलनात आपल्याला सहभाग घ्यायला मिळणार नाही.' हे लक्षात आल्यावर राहीने ते मान्य केलं आणि इतकंच नाही तर 'तरी मी इतरांचं पाहायला जाणार आहे, जिथे मदत लागेल तिथे मी ती करणार आहे. हे तिने पहिल्या सहा महिन्यात म्हणावं हे मला विशेष महत्त्वाचं
वाटलं. शाळेत मुलाना कशी वागणूक मिळते, तशी मुलं रिएक्ट होतात. तिने असं रिएक्ट होण्यामागे अर्थातच तिने शाळेत हे पाहिलं-ऐकलं असणार असं वाटतं आहे. या असल्या गोष्टींतून मुलं घडत असतात. या घडण्यात स्नेहसंमेलनाचा मोठा वाटा असतो. स्टेज असो, स्टेजच्या मागे असो की प्रेक्षकांत बसलेली असो... मुलं या प्रक्रियेत कुठेही असो.. ती काही ना काही शिकत घेत असतात. त्या शिकण्या घेण्याचा एक उपक्रम आपल्या शाळेने उत्तम रीतीने घेतला याबद्दल सगळ्यांचे मनापासून अभिनंदन!!!!